Warning: Creating default object from empty value in /nfs/c03/h02/mnt/56080/domains/logos.nationalinterest.in/html/wp-content/themes/canvas/functions/admin-hooks.php on line 160

займ на карту онлайнонлайн займы

Tag Archives | marathi

Victimless Crime आणि बारबाला

Source : Flickr

Source : Flickr

एखादा गुन्हा घडला की कोणीतरी गुन्हेगार असणार आणि कोणीतरी बळी गेलं असणार हे आपण गृहीत धरतो. मग ही victimless crime काय भानगड आहे? असा कुठला गुन्हा असू शकतो का ज्याच्यात कोणावर अन्याय किंवा कोणाचंच नुकसान होत नाही? Dance Bar चं उदाहरण घ्या. सुरवातीला आपण असं गृहीत धरू की कोणावर कसलीच जबरदस्ती होत नाहीये. जे लोक तिथे जात आहेत ते त्यांच्या मर्जीने  जात आहेत. जे पैसे उडवत आहेत ते त्यांचे स्वतःचे आहेत. बारबाला देखील स्वतःच्या मर्जीने ते काम करत आहेत. आणि हे समस्त लोक १८ वर्षाच्या वर आहेत. जर ह्या व्यवहारात भाग घेणाऱ्यांची हरकत नाही तर हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? पण जर सरकारने ही गोष्ट बेकायदेशीर घोषित केली आणि न्यायालयांनी ते मान्य केलं तर ते victimless crime बनेल.

जुगार, वेश्याव्यवसाय ह्या गोष्टी पण ह्याच प्रकारात मोडतात. आपण ह्या गोष्टी चांगल्या आहेत का वाईट ह्या विषयी भाष्य करत नाही आहोत. फक्त ह्या प्रकारचे गुन्हे आणि चोरी, दरोडा, खून ह्यासारख्या गुन्ह्यांमधला फरक बघतो आहे. जिथे कोणाला तरी इजा होत आहे किंवा त्याच्या मालमत्तेचं नुकसान होत आहे तिथे मामला स्पष्ट आहे पण असे नसते तेव्हा त्याला गुन्हा का म्हणायचं ह्याचा विचार केला पाहिजे.

बरेच वेळा आपण आपले विचार दुसऱ्यांवर लादण्यासाठी ह्या गुन्ह्यांचा उपयोग करतो. मला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तू पण ती करायची नाहीस असं मी घोषित करतो आणि जर ते विचार लादण्याची ताकद माझ्याकडे असेल तर ते मी इतर सगळ्यांवर लादतो. इथे अडचण एवढीच आहे की फक्त बंदी घातल्यामुळे त्या गोष्टीची मागणी कमी होत नाही आणि जिथे मागणी आहे तिथे पुरवठा होतोच. मग ती कामे बेकायदेशीररित्या होऊ लागतात. कोणाचेच त्यावर नियंत्रण राहत नाही आणि एकूण बघता समाजाला फायद्यापेक्षा नुकसान जास्त होतं.

काही लोक हे खरच चांगल्या उद्देशाने करतात. त्यांची अशी समजूत असते की ह्या प्रकारचे व्यवहार करणाऱ्या माणसाला त्याचं भलं कशात आहे ते समजत नाही. म्हणून इतरांनी मिळून त्याला रोखण्याची गरज आहे. अशी प्रेमाची सक्ती पालक आणि मुलं किंवा जवळच्या लोकांमध्ये ठीक असली तरी पूर्ण समाजावर लादली की त्यातलं प्रेम कमी आणि सक्ती जास्त मोठी होते. भारताची घटना व्यक्तीस्वातंत्र्याला खूप महत्व देते. म्हणून एखादी गोष्ट बेकायदेशीर ठरविताना ती करणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला इजा पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे.

अजून एक असे बघायला मिळते की मूळ गुन्हा रोखणे अवघड असते म्हणून कुठे तरी दुसरीकडेच निर्बंध आणले जातात. बायकांवर अत्याचार आणि त्यांना मारहाण करणे हा खरा गुन्हा आहे पण त्याची उकल करण्यासाठी दारूबंदी लागू केली जाते. मग हा victimless crime बनतो. तसंच महिलांना जर जबरदस्तीने dance bar मधे नाचायला लावत असतील तर तो गुन्हा आहे. पण ते बार बंद केल्याने ह्या प्रश्नाची उकल कशी होईल ? त्यांना रोजगाराचे इतर पर्याय निर्माण झाले तरच ही जबरदस्ती नाहीशी होईल.

आता victimless crime ला चांगला मराठी शब्द सुचवा.

Comments { 0 }

‘Inflation’ ला मराठीमधे काय म्हणाल?

Source: Flickr

Source: Flickr

महागाई चलनवाढ असे अनेक शब्द आपण रोजच्या वर्तमानपत्रात वाचत असतो. पण ह्यांचा नक्की अर्थ काय आहे? महागाईसाठी कोणाला दोष द्यायचा हे ठरवण्याआधी ती नक्की कशामुळे निर्माण होते ते पाहूया. महागाई दोन कारणांमुळे होऊ शकते. पहिलं अगदी सोपं आहे. एखादी गोष्ट बनवायला जो कच्चा माल लागतो तो जर महाग झाला तर त्या गोष्टीची किंमत पण आपसूकच वाढणार. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंवा धातूंची किंमत वाढली तर प्लास्टिक स्टील इत्यादी गोष्टींची किंमत पण वाढणार. आपल्याला असे वाटते की आधी महागाई वाढते आणि मग आपला पगार वाढतो पण उत्पादनातला एक महत्वाचा घटक म्हणजे कामगार असतो. म्हणून पगारवाढ हे पण महागाईचं एक कारण असू शकतं. ह्याला अर्थाशात्रात ‘cost push inflation’ म्हणतात.

महागाईचं दुसरं कारण सहसा लक्षात न येणारं आहे. कुठल्याही गोष्टीची किंमत फक्त त्याच्या निर्मितीला लागलेल्या खर्चावर ठरत नाही. बहुतेकदा त्या गोष्टीची किती मागणी आहे आणि किती पुरवठा शक्य आहे ह्या वर त्याची किंमत ठरते. म्हणजे जरी ती गोष्ट बनवायला निश्चित खर्च आला असेल तरी त्याची विकण्याची किंमत अनिश्चित असू शकते. कांद्याचे भाव हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे. कधी ते १० रुपये किलो असतात तर कधी १०० रुपये किलो. उत्पादनाची किंमत तर बदलत नाही मग काय बदलतं? कांदे अशी गोष्ट आहे की ज्याच्या मागणीत फारसा बदल होत नाही पण पुरवठ्यामधे खूप तफावत दिसते. पुरवठा जास्त झाला की किंमती पडतात आणि कमी झाला की किंमती वाढतात. ह्या उलट हॉटेलमधे राहण्याचा खर्च बघा. इथे पुरवठा बऱ्यापैकी स्थिर असतो पण मागणी वर खाली होत असते. म्हणून सुट्टीच्या दिवशी बुकिंग महाग पडते. ह्याला ‘demand pull inflation’ म्हणतात.

पण फक्त कांदे किंवा हॉटेल बुकिंग महाग झालं तर त्याला तुम्ही महागाई म्हणाल का? महागाई म्हणजे सरसकट सगळ्या गोष्टींची किंमत वाढणे. बरेच वेळा चलनवाढ हे महागाईचे कारण असू शकते. जेव्हा RBI जास्त नोटा छापते तेव्हा देशातला एकूण पैसा वाढतो. जर त्या प्रमाणात पुरवठा वाढला नाही तर आहेत त्याच गोष्टी जास्त किंमतीला विकल्या जाऊ लागतात आणि महागाई वाढते.

आता ह्या ‘Inflation’ ला चांगला मराठी शब्द सुचवा.

 

Siddarth Gore is a Research Scholar at the Takshashila Institution and he tweets @siddhya

Comments { 0 }

‘Information Asymmetry’ ला मराठीमधे काय म्हणाल?

सध्या फॅशनमधे असलेली टेराकोटाची कानातली बाजारात २५० च्या खाली मिळणार नाहीत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्या कारागीराला ह्यामधले फक्त १० रुपये मिळतात? बिहारची प्रसिद्ध मधुबनी चित्र घ्यायला गेलात तर ३००० च्या खाली मिळणार नाहीत. पण त्या चित्रकाराला प्रति चित्र फक्त ८० ते १०० रुपये मिळतात. हि इतकी विषमता कशी निर्माण होते?

 

5844860363_33136e2ce0_o

आपल्याला सहसा लक्षात येत नाही पण बाजारात विकल्या जाणाऱ्या  प्रत्येक गोष्टीला ३ किंमती असतात. एक जी ग्राहकाच्या मनात असते , एक विक्रेत्याच्या मनातली आणि तिसरी म्हणजे ज्या किंमतीला सौदा पक्का होतो ती. आपण अगोदर पाहिले आहे की सौदा तेव्हाच शक्य असतो जेव्हा ग्राहकासाठीचं मूल्य (मनातली किंमत) हे विक्रेत्याच्या मूल्यापेक्षा जास्ती असतं. तुम्ही जेव्हा घासाघीस करता तेव्हा खरंतर तुम्ही एकमेकांच्या मनातली किंमत शोधायचा प्रयत्न करत असता. हे गिऱ्हाईक जास्तीतजास्त कितीला गटवता येईल हे विक्रेता शोधत असतो आणि किंमत कमीतकमी किती करता येईल हे गिऱ्हाईक हुडकत असतं. जो हि माहिती अचूक मिळवतो त्याला व्यवहार जास्त फायद्याचा ठरतो. ह्या माहितीच्या तफावतीला अर्थशास्त्रात ‘Information Asymmtery’ असं म्हणतात.

काही प्रकारच्या व्यवहारांमध्ये हि खूप बघायला मिळते. जसं की डॉक्टर आणि रुग्ण. रुग्णाला काय झालंय हे त्याच्यापेक्षा डॉक्टरला खूप जास्त कळत असतं. ठरवलं तर तो त्याचा गैरवापर करू शकतो. म्हणूनच तर आपण डॉक्टर रुग्ण संबंधात विश्वासाला खूप महत्व देतो. वर पाहिलेल्या उदाहरणात कारागीराला त्याच्या कलाकृतीच्या किंमतीचा (विकत घेणाऱ्याच्या मनातली) अंदाज नाही म्हणून त्याचा फायदा कमी होतो. जर ती माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली तर हि विषमता नक्कीच कमी होऊ शकते.

आता ‘Information Asymmetry’ ला चांगला मराठी शब्द सुचवा.

Siddarth Gore is a Research Scholar at the Takshashila Institution and he tweets @siddhya

Comments { 0 }

‘Consumer Surplus’ ला मराठीमधे काय म्हणाल?

4704485328_18a795590d_z

Source: Flickr

एखादा व्यवहार होण्या किंवा न होण्यामागे काय कारणं असतात? एक म्हणजे विक्रेत्याला त्या गोष्टीची जास्तीत जास्त किंमत हवी असते. पण एक अशी किंमत असते जिच्याखाली तो ती गोष्ट विकायला तयार होणार नाही. तसंच ग्राहकाला ती वस्तू कमीत कमी किमतीला हवी असते. पण अशी एक किंमत असते ज्यापेक्षा जास्त तो भरायला तयार नसतो. मग व्यवहार अशाच वेळेला शक्य आहे जेव्हा ग्राहकाची देण्याची तयारी (किंमत) हि विक्रेत्याच्या घेण्याच्या तयारीपेक्षा जास्त असते.

असं समजा की तुम्ही एका नवीन शहरात कपडे विकत घ्यायला गेले आहात. तुम्हाला एक गोष्ट आवडते. त्याची किंमत ५०० रुपये आहे. विक्रेत्याला नफा होण्यासाठी कमीत कमी ३०० रुपये गरजेचे आहेत. तुमचं बजेट ५५० आहे असं समजा. तुम्ही वाटाघाटी सुरु करता. तुम्ही ३०० म्हणता तो ४५० म्हणतो आणि अखेर तुम्ही दोघेही ४०० वर सौदा पक्का करता. आता काय झालं बघा. विक्रेत्याच्या अपेक्षेपेक्षा त्याला १०० रुपये जास्त मिळाले म्हणून तो खूष झाला आणि विकायला तयार झाला. तुम्ही ५५० मोजायला तयार होता पण तुम्हाला ४०० मधे मिळाल्यामुळे तुम्ही पण खूष झाला आणि विकत घ्यायला तयार झाला. इथे असं म्हणता येईल की तुम्हाला १५० रुपयांचा (प्रतीकात्मक) फायदा झाला. अर्थशास्त्रात ह्याला ‘Consumer Surplus’ म्हणतात आणि विक्रेत्याच्या १०० रुपयांना ‘Producer Surplus’ म्हणतात. इथे आपल्याला असं पण लक्षात येतं की व्यवहाराच्या दोन्ही बाजूंना फायदा झाला. म्हणून बाजारव्यवस्था हि एखाद्या खेळासारखी नसते जिथे एक जिंकला म्हणजे बाकीचे हरावेच लागतात.

आता ह्या ‘Consumer Surplus’ साठी चांगला मराठी प्रतिशब्द सुचवा.

Siddarth Gore is a Research Scholar at the Takshashila Institution and he tweets @siddhya

Comments { 0 }

Learning Classical Languages

In August 2006, The Ministry of Tourism laid out the guidelines to determine the eligibility of languages to be considered as a “Classical Language”

  •  High antiquity of its early texts/recorded history over a period of 1500-2000 years.ii)
  • A body of ancient literature/texts, which is considered a valuable heritage by generations of speakers.
  • The literary tradition be original and not borrowed from another speech community
  • The classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the classical language and its later forms or its offshoots.

The press release also mentioned that only Tamil & Sanskrit met thee guidelines. Later, after receiving representation from several scholars,  Kannada, Telugu, Malayalam, Oriya and Marathi were accorded the status of Classical Language. State probably has a role in helping languages but it is the people who eventually decide the ‘fate’ of a language. At a time when a lot of people consider English as the lingua franca, according the status of “classical” or otherwise does very little to the people for in such situations people are mostly motivated by economics and not emotions.

Although the intentions are good, the ‘classical language’ tag has helped very little. For someone sitting in Karnataka, it is easy to learn German/French/Japanese etc  because there are enough resources for an interested individual to pick from. While it is extremely straightforward to enrol and obtain certifications in these foreign languages, it is very difficult for a Bengali(say) to even obtain a rudimentary book like “Learn Kannada through Bengali”.

It is widely accepted that learning a new language provides a new worldview and that it opens up cultural boundaries. But how do we accomplish this when, laughably, it is difficult to procure the basic resources required to learn a language?

 

Comments { 0 }

व्यवहाराची किंमत

Guest post by Ashlesha Gore

मागील भागात आपण गमावलेल्या संधीची किंमत म्हणजे काय हे पाहिले.आता एका अशा किंमतीबद्दल आपण जाणून घेऊया जिच्याशी आपला रोजचा संबंध येऊनही आपण तिकडे दुर्लक्ष करतो.

समजा तुम्हाला एक टीव्ही सेट खरेदी करायचा आहे. तुमच्या जवळच्या दुकानात त्याची किंमत १०,०००/- रुपये आहे पण पेपरमध्ये एका सुपरस्टोरची १०% सवलतीच्या योजनेची जाहिरात आलेली आहे. ते ठिकाण तुमच्या घरापासून साधारण १० किमी लांब आहे. आता ह्यापैकी कोणता व्यवहार अधिक फायद्याचा ठरेल हा विचार तुम्ही करू लागता. फक्त दोन दुकानांमधल्या टीव्हीच्या किंमतीचा विचार केला तर सुपरस्टोर नक्कीच अधिक चांगला पर्याय आहे.

नीट विचार केल्यावर मात्र लक्षात येईल की हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. १० किमी दूर असलेल्या सुपरस्टोरला कारने जाण्यासाठी आणि तिथे गेल्यावर पार्किंगसाठी लागणारा खर्च विचारात घ्यावा लागेल. तसेच तिथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन त्याची opportunity cost लक्षात घेतली तर कदाचित जवळच्या दुकानातून टीव्ही घेणे जास्त फायद्याचे ठरेल. ह्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की कोणत्याही खरेदीची एकूण किंमत ठरवायची असेल तर त्याचे दोन भाग विचारात घ्यावे लागतील. एक – खरेदी केलेल्या वस्तूची किंमत आणि दोन – ही खरेदी करताना जी काही कृती करावी लागते त्याचा खर्च. ह्या दुसऱ्या भागालाच “व्यवहाराची किंमत” (transaction cost) असे म्हणतात.

कोणत्याही व्यवहाराचे तीन घटक असू शकतात:

१. हवी असलेली वस्तू बाजारात शोधणे – खरेदी करतानाची ही पहिली पायरी. हवी असलेली वस्तू आपल्या मनासारखी आणि ऐपतीत बसणारी हवी. ती तशी देऊ शकणाऱ्या दुकानाचा शोध घेणे हे ग्राहकाचे पहिले काम. इंटरनेटचा जमाना यायच्या आधी लोक वस्तूच्या किंमतीचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये चकरा मारीत. तसेच योग्य गिऱ्हाईक मिळविण्यासाठी दुकानदारांना देखील पोस्टर, जाहिरात इत्यादीवर खर्च करावा लागत असे. अशाप्रकारे वस्तू आणि गिऱ्हाईक शोधण्याच्या कामात होणारा खर्च कोणत्याही व्यवहाराच्या किंमतीचा महत्त्वाचा भाग आहे.

२. घासाघीस करणे – वाटाघाटी करताना खर्च होणाऱ्या गोष्टीदेखील व्यवहाराच्या किंमतीत धराव्या लागतात. जर घासाघीस करणे त्रासदायक होत असेल तर ही किंमत इतकी वाढते की व्यवहार होणेच कठीण होऊन बसते. उदाहरणार्थ – काही रिक्षावाले मीटरप्रमाणे न जाता प्रत्येक ग्राहकाशी घासाघीस करीत बसतात. ही गोष्ट अनेक प्रवाशांना दिवसेंदिवस त्रासदायक वाटू लागते आणि त्यांच्यासाठी ह्या व्यवहाराची किंमत खूपच वाढते. त्यामुळे अनेक लोक रिक्षाने प्रवास न करता सरळ जास्त पैसे देऊन कॅबने जातात. म्हणजेच जेवढी जास्त घासाघीस तेवढी त्या व्यवहाराची किंमतही जास्त.

३. व्यवहार करताना ठरलेल्या अटी पाळणे – व्यवहार करताना ज्या अटी ठरलेल्या आहेत त्या पाळल्या जाणे हा त्या व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर त्या अटी पाळण्यासाठी मोजावी लागणारी किंमत जास्त असेल तर तो व्यवहार होऊ शकत नाही. उदाहरणार्थ – तुम्ही नवीन घेतलेल्या कपड्यांचा रंग पहिल्याच धुण्यात उतरला तर साहजिकच आपले नुकसान ताबडतोब भरून निघावे अशी तुमची अपेक्षा असेल. मात्र विकणाऱ्याने नुकसान भरून देण्यास खळखळ केली तर व्यवहार महागात जातो. म्हणून नेहेमी warranty चा उपयोग केला जातो. व्यवहार करतानाची किंमत कमीत कमी असेल हे ग्राहकाला पटवून देण्यासाठी warranty असते.

आता तुमच्या लक्षात येईल की इंटरनेटमुळे व्यवहाराची किंमत कशी कमी झाली आहे आणि हेच ऑनलाईन खरेदीच्या यशाचे गमक आहे.

व्यवहाराची किंमत आणि सरकारी धोरणे यांचा काय संबंध ?

कोणत्याही आर्थिक प्रक्रियेबरोबर transaction cost चा बोजा येतोच. खरेदी करणारा आणि विकणारा दोघांनाही ही किंमत चुकवावी लागते. व्यवहाराची किंमत जेवढी जास्त असते तेवढी ती व्यवहार करण्यासाठी मारक ठरते. ती खूप जास्त वाढली की आर्थिक विकासात अडथळा येतो.

उदाहरणार्थ सार्वजनिक वितरण प्रणाली (public distribution system) बघूया. अनेकवेळा ह्या योजनेचा फायदा गरीब माणसाला मिळतच नाही. ह्याचे कारण भ्रष्टाचार नसून खूप जास्त असलेली व्यवहाराची किंमत हे आहे. लांबवरून PDS च्या दुकानापर्यंत येण्याचा खर्च, अर्धा-एक दिवस रांगेत घालवल्यामुळे तेवढ्या वेळाच्या गमावलेल्या पगाराची किंमत आणि गुणवत्तेची खात्री नसल्याने त्यासाठी द्यावी लागू शकेल अशी सर्वात मोठी किंमत ह्या सगळ्याचा विचार करता बहुतेक लोक खुल्या बाजारातून वस्तू विकत घेणेच इष्ट समजतात.

म्हणून ज्या धोरणामध्ये खरेदी करणाऱ्यास आणि विकणाऱ्यास कमीत कमी व्यवहाराची किंमत द्यावी लागते तेच धोरण उत्तम म्हणता येईल.

Ashlesha Gore handles her family retail cloth store in Pune. She is interested in languages and blogs at ashuwaach.blogspot.in andsanskritsubhashite.blogspot.in in Marathi and Marathi-Sanskrit

Comments { 0 }

गमावलेल्या संधीची किंमत

Guest post by Ashlesha Gore

काहीतरी मिळवायचे असेल तर काहीतरी गमवावे लागते असे म्हणतात. हेच वाक्य अर्थशास्त्रामध्ये देखील लागू पडते. कसे ते बघूया:

आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे कमतरतेचा मुकाबला करण्यासाठीचा एक उपाय म्हणजे प्राधान्यक्रम ठरविणे. म्हणजेच आपली परिस्थिती आणि गरज ह्यांना अनुसरून घेतलेला निर्णय. हा निर्णय आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत असतो. अशा पद्धतीने घेतलेल्या निर्णयालाच इंग्रजीमध्ये ट्रेड-ऑफ असे म्हणतात. जेव्हा आपल्याकडील मर्यादित साधनाच्या बदल्यात आपण एखाद्या गोष्टीची निवड करतो तेव्हा कळत नकळत दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करतो. उदाहरणार्थ एखाद्या पदवीधर तरुण किंवा तरुणीसाठी मर्यादित साधन आहे – वेळ. हा वेळ मूल्यवान पण मर्यादित असतो कारण ह्या टप्प्यात जबाबदाऱ्या कमी असतात मात्र कायमच त्या तशा कमी राहू शकत नाहीत. आता समजा ह्या व्यक्तीकडे आपला वेळ वापरण्याचे दोन पर्याय आहेत – एक म्हणजे पदवी मिळाल्यावर कोणत्यातरी चांगल्या ठिकाणी नोकरी करणे किंवा दुसरा म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम करणे.

कोणताही पर्याय निवडला तरी त्याची किंमत ही चुकवावीच लागते. ही किंमत फक्त पैशांच्या स्वरूपातच असेल असे नाही. जर पदव्युत्तर कोर्स करण्याचा पर्याय निवडला तर कॉलेजची फी, अर्ज करणे ह्यासाठी लागणारी पैशांच्या स्वरूपातील किंमत द्यावी लागतेच. पण ते तेवढ्यावर संपत नाही. हा पर्याय निवडल्यामुळे पूर्णवेळ पगार मिळविण्याची संधी तुम्ही पुढच्या काही वर्षांसाठी तरी सोडता. ही सोडलेली संधी देखील त्या एकूण किमतीचा एक भाग आहे. तसेच तुम्ही जर पूर्णवेळ नोकरी करण्याचा पर्याय निवडला तर नवीन शहरात स्थिरस्थावर होण्यासाठी लागणारी पैशांच्या स्वरूपातील किंमत तर देताच पण त्याचबरोबर तुम्ही मास्टर्स किंवा डॉक्टर ह्या पदवीवर पाणी सोडता. नोकरी करण्यासाठी द्याव्या लागलेल्या किंमतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला सोडायला लागलेल्या संधीची किंमत दाखविणाऱ्या ह्या संकल्पनेला opportunity cost असे म्हणतात.

म्हणजे कोणत्याही ट्रेड-ऑफ ची एकूण आर्थिक किंमत काढायची असेल तर opportunity cost पण खालीलप्रमाणे विचारात घ्यावी लागेल –

एकूण, आर्थिक किंमत = पैशांच्या स्वरूपातील किंमत + गमावलेल्या संधीची किंमत (opportunity cost)

opportunity cost एखाद्या संख्येने अचूकपणे दाखवणे बरेचदा अवघड असते. पण म्हणून कोणत्याही ट्रेड-ऑफ चे विश्लेषण करताना ती सोडून देता येत नाही. ह्याचे कारण असे की एखादा पर्याय निवडल्यानंतर त्याला द्यावी लागणारी पैशांच्या स्वरूपातील किंमत कदाचित कमी असू शकेल पण गमावलेल्या संधीची किंमत खूप जास्त असल्याने एकूण आर्थिक किंमत कितीतरी पटीने वाढते.

सरकारच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास करताना ह्या संकल्पनेची बरीच मदत होते. सरकारजवळ मर्यादित साधने आणि अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यांच्या प्रत्येक धोरणाशी एक opportunity cost निगडीत आहे. म्हणून जेव्हा एखाद्या धोरणाचे विश्लेषण केले जाते तेव्हा त्यासाठी लागणारा खर्च आणि होणारा फायदा ह्याचाच फक्त विचार करून उपयोग नाही. तर हा पर्याय निवडून आपण कोणती संधी गमावली आहे याचा पण विचार होणे आवश्यक आहे. ज्या धोरणामध्ये पैशांच्या स्वरूपातील किंमत आणि  गमावलेल्या संधीची किंमत ह्या दोन्ही कमीतकमी असतील तेच धोरण सर्वात जास्त फायदेशीर आहे असे म्हणता येईल. म्हणून जेव्हा तुम्ही नरेगा, स्मार्ट सिटी किंवा सर्व शिक्षा अभियान यासारख्या धोरणांचा अभ्यास करीत असाल तेव्हा प्रथम “ह्या धोरणामुळे आपण काय मिळवलं आणि काय गमावलं ” ह्याचा जरूर विचार करा. त्यानंतरच हे धोरण यशस्वी झाले किंवा नाही याबद्दल तुम्ही तुमचे मत बनवू शकता.

Ashlesha Gore handles her family retail cloth store in Pune. She is interested in languages and blogs at ashuwaach.blogspot.in and sanskritsubhashite.blogspot.in in Marathi and Marathi-Sanskrit

Comments { 0 }

वाढता हव्यास आणि संसाधनांचा तुटवडा

दुर्मीळ साधनसंपत्ती फुकट असावी काय?

Guest post by Ashlesha Gore

काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने वीज आणि पाण्याचे भाव कमी केले. तेव्हा ह्या मुद्यावरून बरेच चर्वितचर्वण देखील झाले. आणि नेहेमीप्रमाणेच आपण समाजवाद आणि भांडवलशाही अशा अवजड शब्दांच्या जाळ्यात गुरफटलो. मात्र कोणत्याही वस्तूची किंमत मुळात कशी ठरते? हा प्रश्न आपण विचारलाच नाही.

सर्वसाधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर अर्थशास्त्राचा मूलभूत अभ्यास केल्यास सहज मिळू शकेल. पण आपण अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात अशाप्रकारच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. अकरावी बारावीत आपण आधी भारताच्या पंचवार्षिक योजना पाठ करतो. त्यानंतर आपण मार्क्स आणि फ्रीडमन ह्या दोन विचारप्रणालींची एकमेकात तुलना करीत बसून आपले हात धुऊन घेतो. अर्थ ह्या विषयाशी संबंधित इतिहासाला अर्थशास्त्र असे म्हणणे साफ चुकीचे आहे. वास्तविक अर्थशास्त्र हा गणित किंवा विज्ञानाप्रमाणेच एक पायाभूत विषय आहे ज्याचा हेतू माणूस आणि मनुष्यजातीचे व्यवहार समजून घेणे हा आहे. तर मग काही काळासाठी आपल्या ठाम समजुती बाजूला ठेवून अर्थशास्त्र आपल्या ह्या मुख्य प्रश्नाबद्दल काय म्हणते ते पाहूया.

आपले जग हे तुटवड्याचे जग आहे. ह्याचा अर्थ असा की आपल्या गरजा ह्या आपल्या संसाधनांपेक्षा जास्त असतात. गरज आणि उपलब्धता ह्यात अशी तफावत असणे हे कोणत्याही महत्त्वाकांक्षी व्यक्तीचे द्योतक आहे. जेव्हा अशा महत्त्वाकांक्षी व्यक्ती एक समाज स्थापन करतात तेव्हा तो समाज देखील महत्त्वाकांक्षी बनतो. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा काही कोणत्याही “मॉडर्न” काळाचा दोष नव्हे. ही तफावत समाजात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. अश्मयुगात भूक भागविण्यासाठी बरीच शिकार उपलब्ध होती पण शिकार करण्याची क्षमता मर्यादित होती. जेव्हा माणूस शेती करू लागला तेव्हा पाण्याचे स्रोत मर्यादित होते. जेव्हा माणूस यंत्र बनवू लागला तेव्हा यंत्र बनविण्यासाठी लागणारे इतर सुटे भाग मर्यादित प्रमाणात होते. अशाप्रकारे मर्यादित संपदेचा विनियोग हा प्रश्न युगानुयुगे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

दुर्मीळ संपदेच्या ह्या मूलभूत आव्हानाला समाज दोन पद्धतीने हाताळू शकतो. पहिला उपाय म्हणजे नवनिर्मिती. पूर्वी शिकार करण्यासाठी अनेक लोकांची गरज भासत असे जेणेकरून शिकारच शिकार करणाऱ्याला भारी पडू नये याची दक्षता बाळगता येईल. ह्या आव्हानावर एक उपाय होता – हत्यारांचा शोध. ज्यामुळे खाद्यस्रोतांची कमतरता काही प्रमाणात तरी कमी झाली. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी विविध सिंचनपद्धती शोधल्या गेल्या. अशाप्रकारे नवीन शोधांमुळे दुर्लभता कमी होत असली तरी ही प्रकिया नेहेमीच मंदगतीने होते.

कमतरतेशी मुकाबला करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे प्राधान्यक्रम ठरविणे. म्हणजेच प्रत्येकाने आपापली गरज आणि परिस्थिती ह्याला अनुसरून कोणती गोष्ट अधिक मौल्यवान आहे ते ठरविणे. इंग्रजीमध्ये ह्यालाच ट्रेड-ऑफ असे म्हणतात. उदाहरणार्थ – परीक्षेच्या आधी मर्यादित वेळ असतो. ज्याला चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे असते त्याला अशावेळेस सिनेमा, खेळ इत्यादी गोष्टी सोडून अभ्यासावर लक्ष द्यावे लागते. अशातऱ्हेने इतर करमणुकीबरोबर तो अभ्यास ट्रेड-ऑफ करतो.  हीच संकल्पना जेव्हा आपण सामाजिक स्तरावर लावून बघतो तेव्हा असे लक्षात येते की प्रत्येक माणूस संसाधने गोळा करण्यासाठी आपापल्या परीने असे ट्रेड-ऑफ कळत-नकळत करत असतो. ह्या प्रवृत्तीमुळे प्रतिस्पर्धा निर्माण होते आणि अनेक लोक साधनसंपत्ती मिळविण्याच्या स्पर्धेचा एक घटक बनतात. आता निर्णय हा घ्यायचा आहे की ह्या संपत्तीचे वाटप कसे करायचे? कोणाला किती मिळणार? कोणत्याही वस्तूची किंमत दुसरेतिसरे काही नसून ह्याच स्पर्धेची निदर्शक आहे. जास्त किंमत याचा अर्थ वस्तू मिळायला दुर्लभ असून तिला मागणी मात्र कितीतरी पटीने जास्त आहे.

ह्या दोन पद्धतींचा आधार घेऊन आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. स्वच्छ पाणी ही एक दुर्मीळ संपदा आहे. ती जर फुकट वाटली तर काय होईल? एकतर जिच्यासाठी कमी ट्रेड-ऑफ करावा लागतो आहे अशा वस्तूची कदर केली जाणार नाही. त्यामुळे लोकांना आधीच दुर्मीळ असलेल्या साधनसंपत्तीचा अपव्यय करण्यासाठी किंवा अतिरेकी वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. दुसरे असे की पाण्याच्या कमतरतेच्या समस्येलाच आपण बगल दिल्यामुळे भविष्यात नवीन शोध लागण्यासाठी ते मारक ठरते. वरील उदाहरणात बघायचे तर “rainwater harvesting” किंवा पाण्याचे पाझर अडविणे इत्यादी चळवळी दडपल्या जातात.

पाण्याची किंमत वाढविणे गरिबांच्या विरोधात आहे असे येथे सुचवायचे नाही. गरजू लोकांना सरकार इतरही काही पद्धतीने मदत करू शकते. परंतु एखाद्या वस्तूची किंमत कृत्रिमरीत्या कमी केल्यास त्या वस्तूचा नाश तर होतोच शिवाय तिची गुणवत्ताही घसरते.

Ashlesha Gore handles her family retail cloth store in Pune. She is interested in languages and blogs at ashuwaach.blogspot.in and sanskritsubhashite.blogspot.in in Marathi and Marathi-Sanskrit

Comments { 0 }